Saturday, 28 November 2020

मंगलाष्‍टक

मंगलाष्‍टक

साधारणतः लग्न आणि मुंज या कार्यक्रमांमध्ये मंगलाष्‍टक म्हणण्याचा प्रघात आहे. शुभचिंतन, मंगलकामना करणारी ही पदे. 

आठ हा शुभसूचक आकडा म्हणून अशी आठ पदे गाण्याच्या रूढीमुळे याला मंगलाष्‍टक असे नाव पडले, अर्थात् आठ मंगल पदांचा समूह. पण अमकीच आठ पदे म्हणावी असे बंधन नाही, आणि व्यवहारात आठच पदे मोजून म्हणली जातात असेही नाही.

चालीत म्हणण्याच्या आवश्यकतेमुळे सहसा अक्षरगणवृत्तातील रचनांचाच वापर मंगलाष्‍टक म्हणताना केला जातो. वेगवेगळ्या वृत्तांतील रचना प्रसंगी वापरात असल्या तरी शार्दूलविक्रीडित (अक्षरे: १९; गण: म-स-ज-स-त-त-ग; यती: १२व्या अक्षरावर) हे वृत्त मंगलाष्‍टकांसाठी सर्वाधिक पसंतीचे. कालौघात झालेला याचा दुसरा परिणाम असा कि, प्रत्यक्षात मंगलसूचक असा कोणताच थेट आशय नसलेलेही अनेक श्‍लोक केवळ शार्दूलविक्रीडित वृत्तात आहेत आणि मंगलाष्‍टकाच्या प्रचलित चालीत म्हणता येतात म्हणून मंगलाष्‍टकांत गायले जातात. 

या दृष्‍टीने पाहता राजराजेश्‍वर-विरचित 'सर्वमङ्गलाष्‍टकम्' ही एक आदर्श आणि परिपूर्ण रचना आहे. यात मंगलसूचक असे आठ श्‍लोक असल्याने मंगलाष्‍टक ही संज्ञा त्याला चपखल लागू होते. शिवाय कवीने त्यात सर्व देवता, ऐतिहासिक/पौराणिक पूज्य व्यक्‍तिमत्त्वे व समग्र चर-अचर सृष्‍टीचा विद्वत्तापूर्ण रीतीने आणि तारतम्य क्रमाने समावेश केला आहे. 'सर्वमङ्गलाष्‍टकम्' वाचण्यासाठी इथे क्लिक करा.


मंगलाष्‍टकांत गाण्यास उपयुक्‍त असे काही प्रचलित संस्कृत श्‍लोक पुढीलप्रमाणे:

गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा

कावेरी सरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका ।

क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गण्डकी

पूर्णा पूर्णजलैः समुद्रसहिताः कुर्वन्तु नो मङ्गलम् ॥ १ ॥

यावद् वीचीतरङ्गान् वहति सुरनदी जाह्‍नवी पुण्यतोया

यावच्चाकाशमार्गे तपति दिनकरो भास्करो लोकपालः।

यावद् वज्रेन्द्रनीलस्फटिकमणिशिला वर्तते मेरुशृङ्गे

तावच्छम्भोः प्रसादात् स्वजनपरिवृतौ जीवतां दम्पतिर्वै ॥ २ ॥

लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्‍चन्द्रमा

गावः कामदुहा सुरेश्‍वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः ।

अश्‍वः सप्‍तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे

रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु नो मङ्गलम् ॥ ३ ॥

कौमारी कमलात्मजा कमलजा कामेश्‍वरी कालिका

काली कौमुदिकालरात्रिकमलाकात्यायनीकौलिकाः ।

कल्याणी कलिकल्मषापहरिणी कारुण्यकल्लोलिनी

कामाक्षी करवीरवासिनि सदा कुर्वन्तु नो मङ्गलम् ॥ ४ ॥

कण्ठे यस्य विराजते हि गरलं शीर्षे च मन्दाकिनी

वामाङ्के गिरिजासनं कटितटे शार्दूलचर्माम्बरम् ।

माया यस्य रुणद्धि विश्‍वमखिलं तस्मै नमः शम्भवे

स स्थाणुः स्थिरभक्‍तियोगसुलभः कुर्यात् सदा मङ्गलम् ॥ ५ ॥

तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव ।

विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते* तेऽङ्घ्रियुगं स्मरामि ॥ ६ ॥

(* शैव परंपरेत गौरीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि असाही पाठ वापरात आहे.)

मंगलाष्‍टकांत गाण्यास उपयुक्‍त असे काही प्रचलित मराठी श्‍लोक पुढीलप्रमाणे:

शास्‍त्री आश्रम चार जे कथियले त्यांमाजि जो उत्तम

देतो स्वार्थ परार्थ जोडुनि नरा ऐसा गृहस्थाश्रम ॥

झाली बद्ध तया विवाहविधिने स्वीकारुनी सौख्यदा

मांगल्यप्रद सावधान ध्वनि त्यां कुर्यात् सदा मंगलम् ॥ १ ॥

योग्यांमाजि शिरोमणीच अथवा जो पार्वतीचा पती

जो कैलासि करीत वासहि सदा गंगा जयाची सती ।

भाळी चंद्र तसेच नाग शरिरी ज्याच्या रहाती सदा

तो शंभू त्रिपुरारि या वधुवरां रक्षो सदा सर्वदा ॥ २ ॥

माला मंगल अर्पिल्या तनुमने हे ऐक्य होवो खरे

अन्योन्यास अता खरीच समता द्या साथ एकस्वरे ।

कौटुंबी कुळि राष्‍ट्रकार्यि कसुनी लावा पणा आपला

कर्तव्यासचि जागता नर-जिणे हो सार्थ हे तत्त्वता ॥ ३ ॥

काशी कांचि अवंतिका मधुपुरी माया अयोध्या बरी

श्रीमद्‍द्वारवती सुपुण्यजननी विख्यात पृथ्वीवरी ।

क्षेत्रे धर्मपरायणे अनुपमे जी भारती वर्णिली

सौमंगल्य करूनिया वधुवरां कुर्वन्तु नो मंगलम् ॥ ४ ॥

लाभो सन्तति संपदा बहु तुम्हा लाभोतही सद्‍गुण

साधोनी स्थिर कर्मयोग अपुल्या व्हा बांधवां भूषण ।

सारे राष्‍ट्रधुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल

गार्हस्थ्याश्रम हा तुम्हां वधुवरां देवो सदा मंगलम् ॥ ५ ॥

मोठे दोंद कटी‍ फणीन्द्र बरवा भाळी शशी शोभतो

हस्ती अंकुश लड्डु पद्‍म परशू दंती हिरा झळ्कतो ।

पायी पैंजण घाघरी रुणझुणी प्रेमे बरा नाचतो

ऐसा देव गणेश तो वधुवरां कुर्यात् सदा मंगलम् ॥ ६ ॥

अग्नी ब्राह्मण आप्‍त मित्र अवघ्या आवाहिता देवता

आनंदे नवदंपतीस बघती अन् वर्षती अक्षता ।

आशीर्वाद म्हणूनि तांदुळ धरा हे आपुल्या मस्तकी

मागा हेच पुनःपुन्हा वरवधू कुर्यात् सदा मंगलम् ॥ ७ ॥

तेजःपुंज दिसे प्रवालगिरिसा रक्‍तांबरा नेसला

देवांचा अधिदेव तो गणपती या मंडपी बैसला ।

पूजा मान्य करा प्रसन्नवदने स्वीकारुनी वन्दना

आता एकच मागणे गजमुखा कुर्यात् सदा मंगलम् ॥ ८ ॥

अम्बा अष्‍टभुजा त्रिलोकजननी देवी कुलस्वामिनी

आली लग्नघरा निवास करण्या आवाहना ऐकुनी ।

आता तीच उभी मुठीत मिटल्या घेवोनिया अक्षता

माते हो वरदायिनी वधुवरां कुर्यात् सदा मंगलम् ॥ ९ ॥

श्रीवत्सांकित भूषणे तुलसिची आपादमाला रुळे

माथां रत्नकिरीट कौस्तुभ गळां सूर्यप्रभा ना तुळे ।

केयूरांगदकुंडले सुरशना हस्तांबुजी आयुधे

लक्ष्मीयुक्‍त मुरारि तो वधुवरां कुर्यात् सदा मंगलम् ॥ १० ॥

औदार्ये इतरां तिघांस जगती जो जाहला आश्रय

दावी देउनि धैर्य अज्ञ मनुजां सन्मार्ग तो अक्षय ।

जो राजा जनकादिकां जनहिती सद्‍बुद्धि दे निश्‍चल

गार्हस्थ्याश्रम तो तुम्हां वधुवरां देवो सदा मंगलम् ॥ ११ ॥

राणा भीष्मक रुक्मिणीस नयनी, देखोनि चिंता करी

ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कोणासि म्या देइजे।

आता एक विचार कृष्ण नवरा ,त्यासी समर्पू म्हणे।

रुक्मी पुत्र वडील त्यासी पुसणे कुर्यात् सदा मंगलम् ॥ १२ ॥

विष्णूला कमला शिवास गिरिजा, कृष्णा जशी रुक्मिणी

सिंधूला सरिता तरूसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।

रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्रि सत्यव्रता

तैशी ही वधु साजिरी वरितसे, हर्षे वरासी अता ॥ १३ ॥

आली लग्न घडी समीप नवरा घेवोनि यावा घरा

गृह्योक्‍ते मधुपर्क पूजन करा अन्तःपटाते धरा ।

दृष्‍टादृष्‍ट वधूवरां न करिता, दोघे करावी उभी

वाजंत्री बहु गल्बला न करणे, कुर्यात् सदा मंगलम् ॥ १४ ॥

आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरू

भावे सद्‍गुरुते स्मरा गलबला कोणी नका हो करू ।

चिंतावे कुलदेवतेसि हृदयी एकाग्रचित्ते बसा

वेदीच्या कलशासि सादर असा कुर्यात् सदा मंगलम् ॥ १५ ॥

वर उल्लेखिल्याप्रमाणे प्रत्यक्षात मंगलसूचक असा कोणताच थेट आशय नसलेले पण केवळ शार्दूलविक्रीडित वृत्तात आहेत आणि मंगलाष्‍टकाच्या प्रचलित चालीत म्हणता येतात म्हणून मंगलाष्‍टकांत गायले जाणारे काही संस्कृत तसेच मराठी श्‍लोकही पुढे दिले आहेत. केवळ प्रचारात आहेत म्हणून हे श्‍लोक येथे संकलित केले आहेत, यांचे मंगलाष्‍टकांत औचित्य नाही, हे पुन्हा सांगतो.

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥ १ ॥

कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षःस्थले कौस्तुभं

नासाग्रे वरमौक्‍तिकं करतले वेणुः करे कङ्कणम् ।

सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्‍तावली

गोपस्‍त्रीपरिवेष्‍टितो विजयते गोपालचूडामणिः ॥ २ ॥

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्‍त्रावृता

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्‍वेतपद्‍मासना ।

या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता

सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥ ३ ॥

मत्स्यापासुन तीन अन् नरहरी हे चार झाले कृती

त्रेती वामन पर्शुराम मग तो श्रीराम सीतापती ।

ऐसे हे अवतार सात हरि तो द्वापारिचा आठवा

जाणावा कलिमाजि बुद्ध नववा कल्की पुढे दाहवा ॥ ४ ॥

द्वैताभ्यास नको उगे पढु नको दुष्‍टांसि वन्दू नको

शास्‍त्राभ्यास रखो श्रुती चुकु नको तीर्थांसि निन्दू नको ।

काळाचे भय मानसी धरु नको ढोंगास भूलू नको

ज्याचीया स्मरणे पतीत तरले तो शम्भु सोडू नको ॥ ५ ॥

हेरंबा गणनायका गजमुखा सिद्धीश्‍वरा मोरया

चित्ती वास विनायका तव असो भक्‍तास दावी दया ।

काही अन्य न मागतो शुभ तुझे सन्नाम राहो मुखी

न द्रोहास करो कुणि जगति या धी राहु दे सन्मुखी ॥ ६ ॥

प्रारंभी गणनायकासि नमना साष्‍टांगभावे किजे

शेंदूरे डबरोनि सोंड बरवी दूर्वांकुरांचे तुरे ।

माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे

गोसाविसुत वासुदेव कवि रे त्या मोरयाला स्मरे ॥ ७ ॥

कैलासी वसतो सदैव असतो नंदीवरी आरुढ

वामांकी गिरिजा सभाग्य सरिता जीची शिवा आवड ।

भावार्थे नमिता कृपा करि बहू रक्षी दिनाकारण

तो स्वामी गिरिजापती नमन त्या घालोनि लोटांगण ॥ ८ ॥

विशेष नोंद: 

१. शिवतनयवरिष्‍ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्तं शोभितं मोदकेन ।

अरुणकुसुममालाव्यालयज्ञोपवीतं मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि ॥

हा श्‍लोक शार्दूलविक्रीडित वृत्तातही नाही आणि मंगलसूचकही नाही, परंतु मंगलाष्‍टक सुरू करताना गणपतीस प्रथम नमन करण्याच्या हेतूने म्हणण्याचा प्रघात आहे.

२. स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्‍वरं सिद्धिदं

बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं थेवुरम् ।

लेण्याद्रौ गिरिजात्मज‍ं सुवरदं विघ्नेश्‍वरं चौझरं

ग्रामे रांजणसंस्थितं विजयतां कुर्यात् सदा मंगलम् ॥

असा काहीसा श्‍लोकही अनेक ठिकाणी प्रचारात आहे, पण या श्‍लोकातील संस्कृत व्याकरणदृष्‍ट्या बरेच अशुद्ध आहे.